जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिक सुटताना दिसत नाहीय. अगोदरच कापसाला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला असून या दरम्यान राज्यभरात केंद्र शासनाच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले होते. मात्र या केंद्राकडून गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून पारोळा, पाचोऱ्यात कापूस खरेदी बंद पडले आहे. सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कापसाची नोंदणी बंद असल्याचं समोर आले आहे.

यंदाच्या हंगामात कापसाला सहा ते सात हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. एकीकडे शासकीय सोयाबीन खरेदी थांबली असता त्यातच कापूस खरेदीही बंद झाली आहे. अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने कापसाचे वजन दिवसेंदिवस घटत आहे. त्यातच खरेदीला ब्रेक लागल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान पारोळा येथे जिनिंग चालकांना १० फेब्रुवारी रोजी सीसीआयच्या उप महाप्रबधंकांनी पत्र पाठवले आहे.
जळगाव जिल्ह्यात इतरत्र कापूस खरेदी सुरळीत सुरू असताना पारोळा तालुक्यात मात्र ८ जानेवारी पासून कापूस खरेदी बंद आहे. दरम्यान, अपेक्षित असा उतारा येत नसल्याकारणाने व चांगला दर्जाचा कापूस येत नसल्या कारणाने कापूस खरेदी करताना अडचणी निर्माण होत असल्याचे जिनिंग संचालकाचे म्हणणे आहे. महिनाभर पासून कापूस खरेदी बंद असल्याने तालुक्यातील शेतकरी हा कोंडीत व अडचणीत सापडलेला आहे. पारोळा तालुक्यात आता पर्यंत दोन केंद्रांवर ३८ हजार १२७ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.