आज रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशीचा उत्साह संपत नाही तोच, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या, सोमवारी शाळेची घंटा वाजेल, पण त्यानंतर लगेचच पुढचे दोन दिवस, म्हणजेच मंगळवार (८ जुलै) आणि बुधवार (९ जुलै) रोजी राज्यातील बहुतांश शाळा पुन्हा बंद राहणार आहेत.

ही सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नाही, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे आहे. त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षक रस्त्यावर का उतरत आहेत?
गेल्या वर्षी, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी तब्बल ७५ दिवस राज्यव्यापी आंदोलन केले होते. आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर, १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र, १४ ऑक्टोबर रोजी जेव्हा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी झाला, तेव्हा त्यात निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणताही ठोस उल्लेख नव्हता. या प्रकारामुळे शिक्षकांचा मोठा अपेक्षाभंग झाला. वर्ष उलटून गे तरी मागण्या पूर्ण न झाल्याने, शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
काय असेल आंदोलनाचे स्वरूप
येत्या मंगळवारी आणि बुधवारी केवळ शाळा बंद राहणार नाहीत, तर राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येऊन आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार निदर्शने करणार आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ आणि राज्यातील अनेक प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे आंदोलनाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.
शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, “जर सरकारने या दोन दिवसांत आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर होईल.”
पालकांनी काय काळजी घ्यावी?
या दोन दिवसांच्या बंदमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तात्पुरते नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधून या सुट्टीबाबत अधिकृत माहिती मिळवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.











