⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धक्कादायक : शाळकरी विद्यार्थिनींचा पाठलाग करीत विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । राज्यासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच पाठलाग करून दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर शहरातून उघडकीला आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी असलम खान पठाण (रा. देवपुर, धुळे) याला अटक करण्यात आलेली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका काय आहे प्रकार
अमळनेर शहरात राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जायला पायी निघाले असता यावेळी त्यांच्या पाठीमागे संशयित आरोपी असलम खान पठाण हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला. त्यावर विद्यार्थिनीने हात झटकून इतर मैत्रिणींसोबत पुढे पायी जायला निघाल्या. पुन्हा संशयित आरोपी असलम खान पठाण याने तीनही विद्यार्थिनींचा पुन्हा रिक्षाने पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. यातील दुसऱ्या विद्यार्थिनीचा हात पकडून म्हणाला की, ‘ही नाही येत तर तू तरी चल, आपण दोघे फिरायला जावू’ असे सांगून तिचा देखील विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तीनही विद्यार्थिनी घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

पालकांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी असलम खान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांच्या पथकाने संशयित आरोपी असलम खान पठाण याला अटक केली आहे.