जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । जळगाव येथील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांचा खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) हटवला असल्याची माहिती माजी खा.ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सत्याचा विजय उशिरा का होईना, पण होतोच,” असे मत यावेळी मनीष जैन यांनी व्यक्त केले.

नेमकं काय आहे प्रकरण?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने दि.१३ मे २०२० रोजी झालेल्या बैठकीत आर.एल.ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. यानंतर बँकेने हा अहवाल रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर केला आणि संबंधित खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवले गेले. मात्र, कंपनीने या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले होते.
बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, फसवणूक म्हणून श्रेणीकरण करताना योग्य संधी न दिल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यानुसार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका हटवण्यात आला असून, सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमधून नोंदही काढून टाकण्यात आली आहे.
तथापि, बँकेने असेही स्पष्ट केले आहे की, हा निर्णय अंतिम नाही. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून बँक भविष्यात पुन्हा तपास सुरू करू शकते. या निर्णयामुळे राजमल लखिचंद ज्वेलर्स प्रा. लि. ला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या व्यवसायिक प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ठपक्यामुळे आमच्याकडे सीबीआयने कारवाई केली, त्यानंतर ईडीने कारवाई केली. स्टेट बँकेने हा ठपका हटवल्याने पुढील सर्व कारवाई देखील भविष्यात हटवल्या जातील, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्यावर केलेल्या या कारवाईबाबत स्टेट बँकेने दिलगीरी व्यक्त करावी, यासाठी पत्र देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.