⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राजकारणात नवा ट्विस्ट : तांबेंच्या व्यासपीठावर कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्षांच्या मुलीची उपस्थिती !

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । काँग्रेसमधून निलंबित असलेले डॉ सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे पदवीधर मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.पर्यायी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.जळगाव शहरात सत्यजित तांबे यांची सभा होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या व्यासपीठावर दिसून आल्या. यामुळे जिल्ह्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत डॉ सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तांबे यांची भाजपाशी जवळीक वाढली असल्याचे दिसत आहे.इतकेच काय आता भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांना तांबेंना निवडून देण्याची जवाबदारी देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. अश्या वेळी सत्यजित तांबे यांच्या सोबत डॉ. केतकी पाटील या व्यासपीठावर दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान सत्यजित तांबे यांनी आज जळगाव येथे मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला व्यासपीठावर माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस डी भिरुड, डॉ प्रशांत वारके, चंदन कोल्हे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील ह्यादेखील व्यासपीठावर दिसून आल्या. डॉ. केतकी पाटील यांची तांबेच्या व्यासपीठावरील उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरत आहे.