⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जे मिळेल त्यातच राहतात समाधानी, तेच खरे सुखी : एकनाथ महाराज

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला सुखी व्हायचे आहे. पण सुखी होण्याची व्याख्या नेमकी काय आहे ? याच्या शोधात प्रत्येक जण दिसतो. या जगात सुखी तेच आहेत, जे भगवंताचे नामस्मरण करतात व आयुष्यात मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधानी आहेत, असे मार्गदर्शन कीर्तनकार हभप एकनाथ महाराज, जामनेर यांनी भाविकांना केले.

येथील मेहरूण प्रभागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे २२ वे वर्ष आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी रात्री आपल्या ओघवत्या शैलीत कीर्तनकार एकनाथ महाराज यांनी भाविकांचे प्रबोधन केले.

हभप एकनाथ महाराज म्हणाले की, सर्व धावपळ सुखासाठी सुरू आहे. मनुष्यप्राणी सुखी होण्यासाठी धडपडत आहे. मात्र सुख मिळविण्यासाठी कष्ट घेणे कोणालाही चुकले नाही, असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विविध अभंगांचे दाखले दिले. सरतेशेवटी भगवंतच अंतिम हे आपल्याला विसरता कामा नये असे सांगत त्यांनी विविध अभंग आणि भक्तीगीते सादर करीत भाविकांना दोन तास मार्गदर्शन केले.

संसारात सतत कमाईसाठी धावपळ सुरू असते. मात्र सांसारिक प्रपंचातून आलेला मानसिक थकवा दूर करण्यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह महत्वाचा ठरतो. जो शिकू इच्छितो त्याला नक्की ज्ञान द्यावे. पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे सांगत त्यांनी विविध उदाहरण देत जीवन जगण्याचे मूलमंत्र विविध उदाहरण देत समजावून सांगितले.

जगाच्या कल्याणासाठी संतांना अवतार घ्यावा लागला. संतांनी सांगितलेले विचार आणि मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. त्यानुसार आपल्याला जीवन जगण्यासाठी दिशा मिळत असते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी रात्री दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता चिखली येथील हभप दिनेश महाराज किर्तन करणार आहेत.