मोबाइल घेऊन न दिल्यामुळे 6वीत शिकणारा मुलगा शेतात गेला, अन्… अख्या गावात उडाली खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । आजच्या युगात मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. मोबाईल शिवाय कोणतेही काम शक्य नाहीय. या मोबाईलचे व्यसन लहान मुलांना देखील लागले आहे. मात्र आता या व्यसनाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पाचोरा तालुक्यात सातगाव (डोंगरी)सहावीत शिकणाऱ्या मुलाने मोबाइल घेऊन न दिल्यामुळे टोकाचं पाऊल उचलले आहे.

मोबाइल घेऊन न दिल्यामुळे मुलाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ रोजी सायंकाळी घडली असून ऋषिकेश संतोष आवारे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

मृत ऋषिकेश याच्या मोठ्या भावाला वडीलांनी मोबाईल घेऊन दिला होता. त्यामुळे ऋषिकेश यानेही मोबाइल घेऊन देण्याचा आग्रह धरला होता. मात्र वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने ते मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. मुळे त्याने टोकाचे पाऊल उचल्याची गावात चर्चा आहे.

सोमवारी ऋषीकेश याचे आई- वडील आणि मोठा भाऊ कापूस वेचणीच्या कामानिमित्त दुसऱ्याच्या शेतावर गेलेले होते. ऋषीकेश हा निम्म्या वाट्याने केलेल्या दुसऱ्याच्या शेतावर शेळ्या आणि बैल चारण्यासाठी गेलेला होता. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेळ्या घरी आणून बांधून ठेवल्या. नंतर शेतात कोणालाच न सांगता निघून गेला.

सात वाजेच्या दरम्यान वडिलांनी गावात व गावातीलच असलेल्या मुलाच्या मामाकडे तपास केला असता तो आढळून आला नाही. वडील संतोष लक्ष्‍मण आवारे व भाऊ अनिकेत हे दोघे शेतात ऋषीकेशचा शोध घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ऋषीकेश हा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

पोलीस पाटील दत्तू पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दूरध्वनी वरून खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल आर. के. पाटील हे करीत आहे.