खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे
लेवा पाटीदार फाउंडेशनतर्फे सरदार पटेल चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे असते. लेवा पाटीदार समाजाच्या क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण संघाना प्राधान्य मिळाले हि चांगली गोष्ट आहे. उगवत्या खेळाडूंसाठी अशा स्पर्धा खूप मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.
शहरातील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल चषक स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १९ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानात आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ८ सामने खेळले गेले. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे हे सहावे पर्व आहे. स्पर्धेसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षाताई खडसे या ब्रँड अँबेसिडर आहेत. स्पर्धेमध्ये २४ संघ सहभागी होत असून यंदा प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी झालेत.
स्पर्धेचे संध्याकाळी ७ वाजता शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व चेंडू खेळून उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, सुवर्ण उद्योजक भागवत भंगाळे, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सुनील सरोदे, हर्षल ढाके, डॉ. अनंत पाटील, चेतन पाटील हे उपस्थित होते. यावेळी डॉ. केतकी पाटील आणि ललित कोल्हे यांनी मनोगतातून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यानंतर आ. भोळे यांनी सांगितले की, फिटनेस राखण्यासाठी आणि छंद म्हणून खेळण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा मदतनीस ठरतात.
स्पर्धेला मंगळवारी दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मोरया कन्स्ट्रक्शन आणि ओम बिल्ड चॅम्प या संघांमधील सामन्याने सुरुवात झाली. ओम बिल्ड चॅम्प संघाने ५२ धावांनी मोरया संघाचा पराभव केला. तर नंतर झालेल्या भूमी वॉरियर्स आणि लीड्सकेम्स यांच्यात एकतर्फी सामना झाला. त्यात लीड्सकेम संघाने भूमी संघाचा १३५ धावांनी दारुण पराभव केला. सोयो सनरायडर्सने तिसऱ्या सामन्यात अमेय नाईटकिंग्स संघाला ८ धावांनी हरविले. सातपुडा वोरियर्स खिरोदा संघाने ५ गड्यानी विजय मिळवून महालक्ष्मी बिल्डर संघाला नमविले.