जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२३ । जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर घणाघात केलाय.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आपला प्राणपणाला लावला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कधीकाळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केलं होतं. तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी करायला मध्ये होते. पण त्यातून काहीही निश्पन्न झालं नाही. आजही भ्रष्टाचार आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले. पण मनोज जरांगे गुंडाळलं जाणारं व्यक्तिमत्व नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
तो एक फकीर माणूस आहे. एका साध्या माणसाने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारने गंडवागंडवी करु नये. समाजाला सत्य सांगावे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विरोधात शालिनी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवारांनी हा कारखाना कवडीमोल भावात विकत घेतला, असा त्यांचा आरोप आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, हा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला असला तरी त्या आरोपाची चौकशी ईडीकडून सुरु होती. ईडीने तो कारखाना जप्त केला होता. याप्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले होते. पण अजित पवार यांच्या टोळीने भाजपमध्ये प्रवेश करताच ही सर्व प्रकरणं गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामुळे शालिनीताई पाटील यांच्या लढाईला आमचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.