जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. मंगळवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकांवर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. तसेच गिरीश महाजन यांना सवाल केला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
गिरीश महाजन म्हणतात, विरोधकांनी काही माणसं गर्दीत घुसवली, त्यांनी गोंधळ घातला, या आरोपावर उत्तर देताना संजय राऊत असं म्हणाले की, “गिरीश महाजन असं सुद्धा म्हणतील, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला, त्या चिमुरड्या मुली विरोधकांच्या असतील, त्यांना मॅनेज केलं असेल, गिरीश महाजन यांचं डोकं फिरलय. अशा विषयात राजकारण करु नये. यात विरोधकांचा काय संबंध, त्या मुली किती लहान आहेत. पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, पोलिसांवर दबाव येत होता, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
दरम्यान, बदलापुरात दोन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी स्थापनेची घोषणा केली. यावरही राऊत यांनी भाष्य केलं. फडणवीसांनी केलेल्या एसआयटी स्थापनेची काय गरज आहे? आरोपी पकडला आहे. पोलिसांनी तपास केलाय. एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारने ज्या एसआयटीची स्थापना केलेली, फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर 24 तासांच्या आत फडणवीसांनी सर्व एसआयटी रद्द केल्या. तुम्ही एसआयटी मानत नाहीत” असं संजय राऊत म्हणालेत.