अमळनेरात पोलिसांचे ‘विशेष कॉम्बिंग ऑपरेशन’; १२ फरार गुन्हेगार गजाआड, पिस्तूल जप्त

जुलै 2, 2026 2:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अमळनेर शहरात पोलिसांनी आज सकाळी अचानक ‘विशेष कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

amlcombing

या मोहिमेत पोलिसांनी अवैध धंदेवाले, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांना चांगलाच इंगा दाखवला. पोलिसांनी एकूण ११० आरोपींची पडताळणी केली असून त्यापैकी ७० आरोपी आढळून आले, तर १२ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय ७ नॉन-बेलेबल वॉरंट आणि ९ बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्येही संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

अवैध दारूविरोधातील कारवाईत पोलिसांनी ८ ठिकाणी हातभट्टीवर धाडी टाकून सुमारे २,६५० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे १२ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

याशिवाय प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधातही पोलिसांनी धडक कारवाई करत दोन गुन्हे दाखल केले. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. दरम्यान, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या व्यापक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now