जळगाव जिल्हागुन्हे

जळगावात महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवल्याचा आरोप; गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात अवैध वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली असताना वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान काही डंपर घटनास्थळावरून पळवून नेण्यात आल्याचा आरोप होत असून, या कारवाई दरम्यार वाळू माफियांनी दापोरा गावातील नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

dapori

मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा आणि धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी तसेच पोलीस प्रशासनाचा सुमारे २५ ते ३० जणांचा ताफा कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. मात्र कारवाईदरम्यानच वाळू माफियांनी धाडसी पाऊल उचलत काही डंपर प्रशासनाच्या उपस्थितीतच पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कारवाईच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दापोरा गावातील अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. याचवेळी वाळू माफिया आणि त्यांच्या साथीदारांनी गावकऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हातात तलवारी, कुऱ्हाडी आणि चॉपर घेऊन काही जणांनी नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. या गोंधळात एका ग्रामस्थावर थेट वार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सुदैवाने हा वार चुकल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर दापोरा गावात प्रचंड दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वाळू माफियांची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी दापोरे गावातील नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button