जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात जळगाव-भुसावळ दरम्यानच्या भादली रेल्वे स्थानकादरम्यान लखनऊहुन मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये आज १ ऑक्टोबररोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती लोकोपायलटला कळताच तत्काळ ट्रेन थांबवत आग आटोक्यात आणली आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही आहे. पण या घटनेने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ वरून मुंबईच्या दिशेने निघालेली पुष्पक एक्सप्रेस भूसावळहून 6 किलोमीटर पुढे जळगावच्या दिशेने येत असताना बोगी नंबर ४ च्या स्लीपर डब्याच्या चाकाजळून प्रचंड धुर बाहेर येत होता.धूर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहताच प्रवाशांनी तात्काळ ओरडून इतरांना सावध केले. या घटनेमुळे काही काळ गाडीत धावपळ उडाली. तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने गाडी थांबवून आग विझवण्याची मोहीम राबवली. अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोगीच्या चाकाचा लायनर घासल्याने स्पार्क निर्माण झाला आणि त्यातून आग लागली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनेनंतर गाडीला काही वेळ थांबवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली असून, प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबई कडे रवाना करण्यात आला आहे.मात्र या घटनेमुळे २० ते २५ मिनिटे गाडी भादली रेल्वे स्थानकानजीक थांबून होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.








