⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

प्रसिद्ध अभिनेत्री समांथा प्रभूला झाला मायोसिटीस हा गंभीर आजार, जाणून घ्या माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला काहीतरी आजाराने ग्रासले असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरु होत्या. नुकतेच स्वतः समांथाने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली आहे. मागच्या काही महिन्यांपासून समांथा गंभीर आजाराशी झुंजत आहे. समांथाला मायोसिटीस नावाचा आजार झाला असून या संकटातून लवकरच बाहेर पडेल असे तिने म्हटले आहे. मायोसिटीस आजार नेमका काय आहे हे आजही अनेकांना माहिती नसून समांथाचे फॅन देखील चक्रावले आहेत.

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसिटीस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मी हे बरे झाल्यावर तुमच्याशी शेअर करणार होते परंतु त्याला थोडा वेळ लागतो आहे. मी लवकरच पूर्ण बरे होईल असा विश्वास डॉक्टरांना आहे.

मला चांगले आणि वाईट दिवस आले. शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या.. जेव्हा असे वाटते कि यातील एक दिवस मी हाताळू शकत नाही तेव्हा तो क्षण देखील निघून जातो. त्यामुळेच मला असे वाटते कि मी बरे होण्याच्या आणखी जवळ आले आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे दिवस देखील निघून जातील. समांथाने सोशल मीडियात शेअर केलेल्या या माहितीने तिचे अनेक चाहते चक्रावले असून विचारात पडले आहेत. मायोसिटीस आज आपण याच आजाराबद्दल थोडं जाणून घेणार आहोत.

मायोसिटीस या आजारात मांसपेशींना बरीच सूज येते आणि या वाढणाऱ्या सुजेमुळे प्रचंड वेदनासुद्धा होतात. शरीरातील स्नायू या आजरामुळे कमकुवत होतात. यावर योग्य उपचार मिळाला नाही तर या वेदना आणखी वाढतात. स्नायू दुखावल्यामुळे प्रचंड थकवाही येतो. मायोसायटिसचे प्रकार आहेत. यातल्या काही प्रकारांमध्ये त्वचेवर रॅशही येते.

सर्वप्रथम मांसपेशींवर हल्ला करणाऱ्या मायोसिटिस या आजाराचा सर्वात जास्त परिणाम खांदे, नितंब आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंवर होतो. शिवाय या वेदना शरीरातील इतर भागांमध्येसुद्धा होतात. त्यामुळे श्वास घ्यायला आणि अन्न गिळायला प्रचंड त्रास होतो. डोळ्यांच्या आसपासही चांगलीच सूज येते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टी करतानासुद्धा प्रचंड त्रास होतो. या आजाराचं निदान करणं हे कठीण आहे. याची लक्षणं कधीकधी चटकन दिसतात, तर कधीकधी ही लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. या आजाराचं निदान करणंही अवघड असते.

स्नायूंमध्ये प्रचंड वेदना, गिळायला होणारा त्रास, श्वास घ्यायला होणारा त्रास अशी या आजाराची काही ढोबळं लक्षणं आहेत. आपल्या शरीरात कोणत्याही आजाराशी दोन हात करण्यासाठी एक रोग प्रतिकारक शक्ति असते त्यावर हा आजार घाला घालतो. मायोसायटिसमुळे शरीरात जेव्हा ऑटोइम्यून स्थिती निर्माण होते, तेव्हा ती शरीरातील चांगले आणि वाईट विषाणू यांच्यात फरक करू शकत नाही आणि त्यामुळेच शरीरातील हेल्दी इम्यून सिस्टमवर हा आजार आघात करतो जे खूप धोकादायक आहे.

हेल्थ लाइन या वेबसाइटवरील माहितीनुसार अमेरिकेत 50 ते 75 हजार लोकांना मायोसायटिसचा त्रास आहे. दरवर्षी मायोसायटिसचे 1,600-3,200 नवीन रुग्ण आढळून येतात. हा आजार केवळ मोठ्या माणसांनाच नाही, तर लहान मुलांनाही होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा आजार अधिक होतो. उपचाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सर्वप्रथम या आजारात रुग्णाला औषधं आणि स्टेरॉईड देऊन हा आजार नियंत्रणात आणला जातो. यामुळेही जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मात्र नियमित व्यायाम, फिजियोथेरेपी, स्पीच थेरेपीच्या सहाय्याने यावर नियंत्रण ठेवता येते.