जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ३० हजार बचत गटांमध्ये ३ लाखांपर्यंतच्या महिला कार्यरत आहेत. या बचत गटांमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन केले जात असते. या बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून ५ ठिकाणी ‘रुरल मार्ट’ तयार करण्यात येणार आहेत.

या रुरल मार्टमधून महिला बचत गटांकडून तयार होणाऱ्या वस्तू इतर उत्पादन, खाद्य पदार्थाची विक्री करता येणार आहे. या ‘रुरल मार्ट’मुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळू शकणार आहे. हे रुरल मार्ट बहिणाई मार्ट नावाने ओळखले जाणार आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ३० हजार महिला बचत गट आहेत. या बचत गटांमध्ये तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी प्रदर्शन, महोत्सव भरावे लागते. त्यातही हे प्रदर्शन वर्षभरात केवळ एक-दोन वेळाच भरले जाते. बचत गटांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाला कायमची बाजारपेठ मिळावी म्हणून हे ‘रुरल मार्ट’ फायद्याचे ठरणार आहेत.
जिल्ह्यातील या ठिकाणी तयार होणार ‘रुरल मार्ट’
‘रुरल मार्ट’साठी जिल्ह्यातील पाच ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील म्हसावद, धरणगाव तालुक्यातील पाळधी, जामनेर, भुसावळ तालुक्यातील साकेगाव व पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा या ठिकाणांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत जे खासगी मार्ट, मॉल आहेत त्याच धर्तीवर ‘रुरल मार्ट’ तयार करण्यात येणार आहेत.
‘रुरल मार्ट’साठी जिल्हा नियोजन
२ समितीकडून ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येक मार्टसाठी प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकूण ५ कोटींचा निधी मिळणार आहे. लवकरच या मार्टचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.