जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडलीय. ती म्हणजे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वाढलेल्या वादानंतर हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याचे अनेक वादग्रस्त प्रकार उघडकीस आले. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत होती.

या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र दिलं. आता हाती आलेल्या माहितीनुसार चाकणकरांचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार आहे. त्यांना या पदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आरोप होत असल्याने रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या.











