⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याच्या बहाण्याने युवकाला १५ हजार रुपयांचा गंडा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करत, भामट्याने युवकाला १५ हजार रुपयांचा गंडा घातला. अमळनेर येथील इस्लामपुरा भागात १९ रोजी ही घटना घडली. याबाबत येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला.

अमळनेरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी शेख मोहम्मद शेख जुनेद यांच्या मोबाईलवर १९ रोजी भामट्याने फोन केला. आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून अधिकारी रोहितसिंग बोलतो. तुमच्या क्रेडीट कार्डचे लिमिट ९० हजार रुपयांवरून वाढवून ते १ लाख ६५ हजार रुपये करून देतो, असे त्याने सांगितले. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मला सांगा, असे भामट्याने शेख मोहम्मद यांना सांगितले. शेख मोहम्मद यांनीही मोबाईलवर आलेला ओटीपी भामट्याला सांगितला. त्यामुळे भामट्याने प्रत्येकी पाच हजार असे तीनवेळा एकूण १५ हजार रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेतले. ही बाब समजताच शेख मोहम्मद यांनी बँकेच्या ग्राहक क्रमांकावर फोन लावून त्यांचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याने पुन्हा शेख मोहम्मद यांना फोन केला. त्यावेळी तुमचे पैसे २४ तासांत खात्यात परत येतील असे सांगितले. परंतु दोन दिवस उलटूनही पैसे परत न आल्याने, गुन्हा दाखल केला.