पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० कोटी रूपयांची मदत : आ. किशोर पाटील

ऑक्टोबर 29, 2021 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता अतिवृष्टीतमुळे खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर मी सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरिता पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासानने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात केली आहे. ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल १०० कोटी रूपये मदत मिळणार आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

MLA kishor Patil jpg webp

यावेळी ऍड. दिनकर देवरे, दीपक राजपूत, डॉ. भरत पाटील , ऍड. अभय पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वत: शेतकऱ्यांची व्यथा पाहीली. ते दुख: विसरून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. ही परीस्थीती पाहणे माझ्यासाठी अवघड होते. म्हणून मी शेतकऱ्यांशी फेसबुकव्दारे संवाद साधत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषाच्या तीन पट भरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर रब्बीत झालेल्या नुकसानीचीही तातडीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ही मागणी देखील केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात रब्बी हंगामाच्या नुकसानीची मदत जाहीर केली. तर अतिवृष्टीची पुर्वीच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली.

रब्बीसाठी १९ कोटी अनुदान
रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल १९ कोटी ५० लाख अनुदान भडगाव-पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील १८ कोटी एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला १ कोटी ३१ लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे पाचोरा भडगाव मतदार संघाला ५० टक्के पेक्षाही अधिक अनुदान मिळवण्यात आपल्याला यश आले. याचे मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

खरीपाला मिळणार ८० कोटी
ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे ८० कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे. त्यात पाचोरा तालुक्याला ५० कोटी तर भडगाव तालुक्याला ३० कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शासनाने कालच निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दोन-चार दिवसात तेही अनुदान प्रत्यक्षरीत्या त्या-त्या तालुक्यांना प्राप्त होईल. त्यानंतर जलद गतीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे आणि आनंदही असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

शेतकऱ्यांना दिलेले वचन पुर्ण केल्याचे समाधान
अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत होता. त्यामुळे दिवाळी सण असुनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. याचे खूप दुःख मला मनात बोचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची हीच व्यथा मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने मदत जाहीर केली. प्रत्यक्ष अनुदान वाटपाला सुरवातही झाली आहे. आपण दिवाळीपुर्वी अनुदान देऊ शकल्याचे अन् तर शेतकऱ्यांना दिलेले वचन पुर्ण करु शकल्याचे खुप मोठे समाधान आहे.
– आमदार किशोर पाटील, पाचोरा-भडगाव मतदार संघ

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now