⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार ; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढू लागल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । कोरोना प्रादुर्भावाचा खाद्य तेलांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तेलाच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ते पुन्हा घसरून दुसर्‍या लाटेपूर्वी पूर्वपदावर आले होते. परंतु आता पुन्हा खाद्य तेलाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सामान्यांचे किचन बजेट पुरते कोलमडून गेले आहे.

गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलाचे ९०० एमएलचे पाऊच १३० रुपयाला होते. त्याचे होलसेलमधील दर आता १४२ तर किरकोळ बाजारातील दर १४७ झाले. सुटे तेलाचे दर १४० रुपये किलो होते ते घाऊक बाजारात १५२ तर किरकोळ बाजारात १५७ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

शेंगदाणा तेलाचे दर १४५ रुपयांवर आले होते. त्याचे घाऊक बाजारातील दर आता १५५ रुपये किलो झाले असून रिटेल बाजारात १६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सूर्यफुलाचे भाव गेल्या आठवड्यात १४०  रुपये किलो होते. ते १४० घाऊक बाजारात तर किरकोळ बाजारात १५५ रुपये झाले आहेत. चढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत.

ही आहेत भाववाढीची कारणे

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. हंगामाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच पीक उशिरा हातात येईल. त्यामुळे तेलाचे उत्पादन उशिरा बाजारात येईल. त्याचप्रमाणे आगामी महिन्यात गणेशोत्सव, नवरात्रपासून सणवारांना सुरुवात होत आहे. या काळात तेलाची मागणी वाढते. त्यामुळे बाजारपेठेत मागणी जास्त व पुरवठा कमी होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर होऊ शकेल. पुन्हा तेलाचे दर 160 रुपयांपर्यंत जाऊ शकतील, असे तेलाचे घाऊक व्यापारी पीयूष बियाणी यांनी सांगितले.