⁠ 
शनिवार, मे 18, 2024

रिक्षाचालकाची इमानदारी, प्रज्ञाचक्षू प्रवाशाची रक्कम केली परत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । शहरातील एका रिक्षा बसलेल्या प्रज्ञाचक्षू प्रवाशाची वीस हजाराची रोकड असलेली पिशवी रिक्षातच राहिली. रिक्षाचालकाने त्या प्रज्ञाचक्षू प्रवाशाचा संपर्क क्रमांक शोधून त्याला ती रक्कम आणि पिशवी इमानदारीत परत केली. रिक्षाचालकाच्या इमानदारीचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले असून सह पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी त्यांचा सन्मान केला आहे.

जळगावातील रिक्षाचालक विजय प्रकाश पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, अजिंठा चौफुली शाखा, जळगाव येथे नोकरीस असलेले प्रज्ञाचक्षू परमेश्वर दत्तु पाटील यांना दिनांक ३ ऑगस्ट रोजी अजिंठा चौफुली येथुन खोटेनगर येथे रिक्षाने सोडले. यावेळी त्यांचे जवळील सामानापैकी २० हजार ५०० रुपये रोख व इतर महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी अनावधानाने रिक्षात राहुन गेली होती. रिक्षा चालक विजय पाटील यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकवरुन परमेश्वर पाटील यांचा मोबाईल क्रमांक शोधुन त्यावर संपर्क साधुन त्यांची पिशवी रोख रक्कम व कागदपत्रासह सुस्थितीत काही वेळातच परत केली.

कोरोनामुळे लॉकडाऊन तसेच इतर निर्बंध असलेल्या काळात रिक्षा चालक विजय पाटील यांचा व्यवसाय व आर्थिक परिस्थीती बिकट असतांना प्रामाणिकपणा दाखविल्याने शहर पोलीस प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी विजय पाटील यांचा सन्मान केला आहे. तसेच आपण भविष्यात देखील अशाच प्रकारे प्रामाणिकपणे कार्य अविरतपणे चालु ठेवावे, अशा सदिच्छा दिल्या आहेत.