अबब! सायबर ठगांनी भुसावळच्या निवृत्त अधिकाऱ्याला लावला ८० लाखाचा चुना ; अशी झाली फसवणूक?

डिसेंबर 13, 2025 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८० लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आलीय. सुकदेव पांडुरंग चौधरी (८६, रा. भुसावळ) असं फसवणूक झालेल्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव असून सायबर भामट्याने मनी लाँड्रींग, दहशतवादी कारवायांसाठी तुमच्या बैंक खात्यांचा वापर झाल्याची भीती घालून ८० लाख पाच हजार ४१६ रुपये उकळले. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

fraud jpg webp

भुसावळात वास्तव्यास असलेले महावितरणचे सेवानिवृत्त सुकदेव चौधरी यांना २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला व डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. आपल्या नावे बरेच बनावट फोन क्रमांक असून त्याद्वारे अनेकांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. याबाबत फसवणूकप्रकरणी कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.

२८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सेवानिवृत्तास कॉल आला व पॉर्नोग्राफी व्हिडीओ बघत असल्याने तसेच अतिरेक्यांकडून पैसे घेत असल्याने गुन्हा दाखल असून यातून वाचण्यासाठी बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. घाबरून निवृत्ताने ६ नोव्हेंबर रोजी ३८ लाख २५ हजार २०८ रुपये, १० नोव्हेंबर रोजी २१ लाख १० हजार २०८ रुपये, ५ डिसेंबर रोजी २० लाख रुपये पाठविले. रक्कम पाठविल्यानंतर कॉल येणे बंद झाले.

दरम्यान, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ, त्यासाठी तुमचे आधार कार्ड पाठवा, असेही सांगितले. त्यानुसार आधार कार्डचा फोटो मोबाइलवर पाठविला. मात्र, तुमच्या नावावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा असून त्यावरून दोन कोटींचा व्यवहार झाला असून ती रक्कम अतिरेक्यांना ट्रान्सफर झाल्याचे दिसत असल्याने हे सर्टिफिकेट देता येणार नसल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now