जळगावात राज्यव्यापी व्यापारी बंदला प्रतिसाद ; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

डिसेंबर 5, 2025 5:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांनी दिलेल्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला जळगाव शहरात मिश्र प्रतिसाद मिळाला. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांनी आणि दाणा बाजारातील व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आज शुक्रवारी ५ डिसेंबर आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

dukanclose

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर आधीच जीएसटी लागू असताना, त्याचबरोबर बाजार समिती कर (सेस) आकारला जातो. हा बाजार समिती कर (सेस) पूर्णपणे रद्द करावा, तसेच ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जळगाव शहरातील शेकडो व्यापारी सहभागी झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक धान्य आणि शहरातील दाणा बाजार परिसरातील १७० हून अधिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. आज सकाळी ११ वाजेपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

या बंदमुळे आज राज्यभरातून जळगाव बाजार समितीत येणारा शेतमाल येऊ शकला नाही, तसेच बाजार समितीतून बाहेरील जिल्ह्यांमध्ये जाणारा माल देखील जागेवरच थांबला. परिणामी, शेतमाल वाहतूक आणि खरेदी-विक्रीची संपूर्ण साखळी खंडित झाली. व्यापाऱ्यांच्या या एकजुटीमुळे सरकारने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजार समितीचे कामकाज ठप्प झाल्याने शेतकरी आणि ग्राहकांनाही काही प्रमाणात फटका बसला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now