जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । यावल पोलिसांनी शहर व पिंप्री गावाजवळ तापी काठावरील गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट केल्या. १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत १० जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे काही विक्रेत्यांनी चक्क तापी नदीच्या पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये दारूचे कच्चे रसायन लपवले होते. पोलिसांनी पोहून जात हे रसायन बाहेर काढून नष्ट केले.
अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे व पथकाने मंगळवारी सकाळी पिंप्री गावाजवळील तापी काठावर छापा टाकला. येथे गावठी दारू गाळताना आढळलेल्या ८ जणांना ताब्यात घेतले. त्यात लालचंद भास्कर कोळी याच्याकडून १७ हजार, आकाश रामकृष्ण कोळी १६ हजार, राकेश मधुकर कोळी १७ हजार, आकाश श्रावण कोळी १५ हजार, सचिन सुभाष कोळी १६ हजार, रतिलाल हरि कोळी १५ हजार, प्रकाश अशोक सोनवणे १४ हजार (सर्व रा.भोलाणे ता.जळगाव) व भास्कर पुंडलिक कोळी (रा.पिंपी) याच्याकडून १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यापैकी काही विक्रेत्यांनी तापी पात्रातील पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये दारूचे रसायन लपवून ठेवले होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी तापीत पोहून हे रसायन बाहेर काढून नष्ट केले. आयपीएस आशित कांबळे, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार सिकंदर तडवी, किशोर परदेशी, अशोक बाविस्कर, सहाय्यक फौजदार अस्लम खान, हवालदार अशोक जवरे, बालक बाऱ्हे, संदीप सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
शहरातील बोरावल गेट भागात बंडू सुकलाल पाटील याच्याकडून दीड हजाराची गावठी दारू, तर ज्ञानेश्वर जनार्दन कोळी याच्याकडून ५२५ रुपयांची देशी दारू पकडली.