Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । रावेर शहरातील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात राबविलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणात सुमारे दिड कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी 20 एप्रिल रोजी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत पंचायत समितीचे लेखाधिकारी, आजी-माजी ग्राम विस्तार अधिकार्यांसह एकूण 24 संशयीतांना अटक करण्यात आली असून या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस विभागाकडून सुरू आहे. पुढील आठवड्यात एकूण 27 जणांविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील पंचायत समितीच्या माध्यमातून कर्मचार्यांसह एजंटांनी अनुदान वितरणाचा लाभ घेत सुमारे एक कोटी 54 लाख 65 हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी 20 एप्रिलला गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची चौकशी पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सूक्ष्म पद्धतीने करीत या गुन्ह्यात आतापर्यंत 24 जणांना अटक केली. या संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र पुढील आठवड्यात न्यायालयात पोलिसांतर्फे दाखल होण्याची शक्यता आहे.