जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्वस्त धान्यासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी केवायसी केलेल्या कुटुंबीयांना आता मार्च अखेर पुन्हा केवायसी करावे लागत आहे. मागील केवायसीचा डाटा उपलब्ध होत नसल्याने नव्याने ही प्रक्रिया करावी लागत आहे. मार्चअखेर असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय धान्य मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

ई-पॉस मशीनला वारंवार सव्र्व्हरची समस्या येत आहेत. दुसरीकडे केवायसीची मुदत ३१ मार्चपर्यंतच आहे. केवायसीसाठी तीन महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, घरातील सदस्यांना तासन्तास स्वस्त धान्य दुकानासमोर उभे राहावे लागते. त्यातच रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांनाही त्रास सहन करावा लागत आहे.