विद्यापीठात आढळला दुर्मीळ ‘काळा गरुड’
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जैवविविधतेने समृद्ध आहे. पक्ष्यांच्या बाबतीतही विविधता असून, विद्यापीठ परिसरात पाणपक्षी, शाखारोही आणि जमिनीवर वावरणारे पक्षी वर्षभर दृष्टीस पडतात. वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र तथा विद्यापीठ कर्मचारी अरुण सपकाळे हे पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांना ‘काळा गरुड’ (ब्लॅक इगल) हा पक्षी दिसला.
नेहमी बघतो त्या पेक्षा हा पक्षी वेगळा आणि आकाराने मोठा असल्याचे त्यांना जाणवले. इतर लहान पक्षी त्याला हुसकावण्यासाठी त्रास देत होते; पण या गरुडावर काहीच फरक पडत नव्हता. उत्तर महाराष्ट्रात काळ्या गरुडाला दुर्मीळ मानले जाते. प्रामुख्याने घनदाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या दुर्मीळ काळ्या गरुडाच्या नोंदीने विद्यापीठाच्या जैवविविधतेत अजून एका दुर्मीळ पक्ष्याची भर पडली. गेल्या १५ दिवसांत दोनवेळा या पक्ष्याची नोंद झाली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, अमन गुजर, रवींद्र सोनवणे, योगेश गालफाडे, नीलेश ढाके, अजीम काजी, अरुण सपकाळे हे विद्यापीठ परिसरात निरीक्षण करुन नोंदी घेत आहेत.
काळा गरुडाचा उष्णकटिबंधीय, डोंगराळ प्रदेशातील घनदाट जंगलात अधिवास
काळा गरुड हा शिकारी पक्षी आहे. सर्व गरुडांप्रमाणे ताे ऍसिपिट्रिडे कुटुंबातील आहे. ताे इक्टिनेटस वंशातील एकमेव सदस्य आहे. उष्णकटिबंधीय, दक्षिण आणि आग्नेय आशिया, आग्नेय चीनमधील डोंगराळ प्रदेशातील घनदाट जंगलात ताे अधिवास करताे. काळ्या गरुडाचे प्रजनन उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय आशियात होते. हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमेकडे नेपाळमार्गे हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या भारतीय राज्यांत, तसेच द्वीपकल्पीय भारत, श्रीलंकेमधील पूर्व व पश्चिम घाटात ताे आढळताे. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वन्यजीव संरक्षण संस्थेने त्याच्या नोंदी घेतल्या आहेत. शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. गौताळ्यात पाटणा देवी परिसरातही त्याचे वास्तव्य आहे. ही प्रजाती वायव्य भारतातील अरावली पर्वतरांगेतही पसरलेली आहे. दक्षिण चीन (युनान, फुजियान), तैवान, दक्षिणपूर्व आशियातही ताे आढळताे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की हा पक्षी चांगले वनाच्छादित जंगलांना पसंती देताे. ज्या भागात ५० टक्क्यांपेक्षा कमी वनआच्छादन असते तेथे खूप कमी आढळताे.