⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Rain Alert : पुढच्या ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस, जळगावात मृगसरी काेसळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । राज्यात मान्सूनची प्रतिक्षा असताना आता राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ५ दिवसांत राज्यात मेघगर्जनेह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ९ ते ११ जून दरम्यान मृगसरी काेसळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडक देण्यापूर्वीच त्याचा प्रवास मंदावल्यामुळे पुढचा प्रवासही लांबणीवर पडणार आहे. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा जेव्हा उत्तरेकडे सरकेल, तेव्हा मान्सूनची वाटचाल अधिक जोमाने होण्यास सुरुवात होईल. ही स्थिती हळूहळू तयारही होतेय. त्यामुळे मान्सून लवकरच दणक्यात आगमन करेल, अशी शक्यता आहे.

राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत असला तरी पुढच्या ५ दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात ९ जून राेजी ५ मिली मीटरपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज वर्तवला आहे. १० जून राेजी १८ तर ११ जून राेजी १० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेगही १८ ते २१ किमी दरम्यान राहणार आहे. या काळात आर्द्रता सकाळी ७० टक्क्यापर्यंत तर दुपारी ३० टक्यापर्यंत राहू शकते.

तापमान पुन्हा चाळिशीत
दरम्यान मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर कायम होता. तो आता पुन्हा चाळीशीत आला आहे. बुधवारी ८ जून राेजी जिल्ह्यात ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नाेंदविले गेले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत होता. काल सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला –३६ अंश
१२ वाजेला – ३७अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ३९ अंश
३ वाजेला – ४० अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ४० अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३८ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ तर रात्री ९ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.