⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगावच्या तरुणाचा डंका ! सैन्यदलात झाला लेफ्टनंट अधिकारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२२ । प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते आपलाही मुलगा चांगले शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा.. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण देखील रात्रंदिवस मेहनत घेत असतात. यात मात्र काहींना यश मिळविता येते तर काहींच्या पदरी नैराश्य पडते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावच्या तरुणाने तरुणाने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट अधिकारी म्हणून शपथ घेतली. राहुल पाटील असे या लेफ्टनंट अधिकारी झालेल्या सैनिक पुत्राचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी ज्याठिकाणी सैन्यदलात शिपाई म्हणून शपथ घेतली होती, त्याचठिकाणी राहुल पाटील लेफ्टनंट अधिकारी झाला.सैनिकाच्या मुलाच्या या अभिमानास्पद कामागिरीबाबत त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

राहुल हा वाघडू गावचे शरद पाटील यांचा मुलगा आहे. त्याने गावातील पहिला लेफ्टनंट अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. राहुलने बिहार राज्यातील गया येथे पाच वर्षे सैन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले यानंतर त्याचे वडील शरद पाटील यांनी ज्याठिकाणी सैनिक म्हणून शपथ घेतली होती, त्याचठिकाणी त्याने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट अधिकारी म्हणून शपथ घेतली. ग्रामीण भागातील या तरुण अधिकाऱ्याची प्रवास हा आजच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे.

राहुल पाटील या तरुणाने प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे नागपूर येथील आर्मी स्कूल येथे पूर्ण केले. येथे त्याने सैन्यदलात अधिकारी होण्याचा ध्यास घेतला. आर्मी स्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या एनडीए परिक्षेचा निकाल लागला. 2019 साली त्याने ही परिक्षा दिली होती. त्यात या तरुणाने प्रेरणादायी यश संपादन करत लेफ्टनंट अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. राहुलने या परिक्षेत महाराष्ट्रातील मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सैनिकाच्या मुलाच्या या अभिमानास्पद कामागिरीबाबत त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.