जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । जळगाव काँग्रेसच्या जिल्हा बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मात्र या आयोजित जिल्हा बैठकीत जोरदार राडा पाहायाला मिळाला. काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवाराच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद होऊन दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवर धाऊन गेल्याचा प्रकार पहायला मिळाला.

सदर बैठकीत बोलू न दिल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे समर्थकांमध्ये वाद झाला. बैठक सुरू झाल्यानंतर काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. या बैठकीत अनिल शिंदे यांना देखील बोलायचे होते. मात्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे की बैठकीचे आपण अध्यक्ष आहोत. कोणी बोलायचे हे आपण ठरविणार. जो आपले ऐकणार नाही त्यांना सभागृहाचा बाहेर जावे लागेल असे जाहीर केले, त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला.
दरम्यान बैठकीतील गोंधळानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व अनिल शिंदे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. यात प्रदीप पवार यांनी अनिल शिंदे हे काँग्रेसच्या पदाधिकारी नसून सहसचिवांच्या म्हणण्यानुसार जास्त भाषणबाजी करायची नव्हती. मात्र शिंदे यांच्या कडून काँग्रेस जिल्हाध्यक्षांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर अनिल शिंदे यांनी म्हटले कि, अनुभव मांडून येथील वस्तुस्थिती सांगायची होती. पण बोलू दिले नाही. निवडणुकीत पवार आले नाहीत. पक्षाने दिलेल्या निधीतून २ लाख त्यांनी घेतल्याचे म्हटले आहे. पक्ष नाही माणसे वाईट असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.