जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२५ । एकीकडे पुण्यातील कोरगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांचा जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठे नेते आमदार एकनाथ खडसेंनी पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली.

गोखलेनगर येथील सरकारी मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा आणि त्यावर टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘शासकीय मालमत्ता मिळकतीचे बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळविण्याबाबतचं माझं पत्र आहे’, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते असताना माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी त्यांच्याकडे ही माहिती आणली होती. यानंतर त्यांनी १५ जून २०१४ रोजी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या या जमिनीवर टीडीआर मंजूर करू नये, अशी सूचना केली आणि संभाव्य घोटाळा थांबवला.







