जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच जळगाव शहरात एका २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेल्स आणि लॉजमध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार दिला, इतकेच नव्हे तर याचे कारण विचारले असता तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रोशन मुकेश निकम (वय ३३ वर्षे, रा. निमखेडी, जळगाव) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी पुणे येथे नोकरीला आहे. मार्च २०२४ ते ११ मे २०२६ या कालावधीत आरोपी रोशन निकम याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पाडून आरोपीने जळगाव शहरातील स्टेशन रोड भागातील एका लॉजवर, तसेच एमआयडीसी परिसरातील कुसुंबा नाका येथील एका ठिकाणी आणि इतर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने रोशनकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला, मात्र त्याने लग्न करण्यास साफ नकार दिला. दरम्यानच्या काळात, संशयित आरोपी रोशन याचे दुसऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक माहिती पीडित तरुणीला मिळाली.याबाबत तरुणीने रोशनला जाब विचारला असता, त्याचा राग अनावर झाला. त्याने पीडित तरुणीला केवळ लग्नास नकार दिला नाही, तर तिला बेदम मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला.
अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोशन मुकेश निकम याच्याविरुद्ध बलात्काराचा (Rape) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.








