⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

कचरा न दिसण्याचा ‘तो’ चष्मा कुठे विकत मिळेल? : संतप्त नागरिकांचा सवाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरामुक्त शहरांमध्ये जळगाव शहराचा सहभाग करण्यात आला आहे. त्याच बरोबर जळगाव शहराला स्वच्छतेबाबत ३ स्टार देण्यात आले आहेत. या समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे जळगाव शहरातले समस्त नागरिक आश्चर्यचकित झाले असून कचरा न दिसण्याचा चश्मा नक्की मिळतोतरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव लाईव्हने गेल्या महिन्यातच जळगाव शहराचा रियालिटी चेक केला होता. यावेळी घेतलेल्या प्रभाग दौऱ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली होती ती म्हणजे शहरातल्या कित्येक ठिकाणी घंटागाडी येत नाही म्हणून नागरिक कचरा अस्ताव्यस्त टाकतात. याच बरोबर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग देखील पाहायला मिळत होते. असे असतानाही नक्की समितीला कोणत्या प्रकारचे जळगाव दाखवण्यात आलं आणि समिती जेव्हा फेब्रुवारी महिन्यात आली होती तेव्हा जळगाव नक्की कुठे हलवण्यात आले होते? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव’ संकल्पना महापालिकेतर्फे जरी राबवण्यात येत असली तरी देखील ते स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका हवे ते कष्ट घेत नाही अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या महासभेत कचरामुक्त शहराबाबत प्रस्ताव पाठवण्याची हिम्मत महानगरपालिकेने का दाखवली नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.