जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथील कोर्टाच्या आवारात एका वकिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचा निषेध करत अमळनेर वकील संघातर्फे प्रांतांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आहे.
चाळीसगाव येथील कोर्टाच्या आवारात अॅड. सुभाष खैरनार यांच्यावर किसन मोतीराम सागळे याने २६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना क्रूर असून दहशत निर्माण करणारी आहे. भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात अॅडव्होकेट प्रोटेक्शन-लॉची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर वकील संघातर्फे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर अॅड. राकेश पाटील, अॅड. आर. व्ही. कछवा, अॅड. आर. बी. चौधरी, अॅड. शकील काझी, अॅड. एस. के. ससाणे, अॅड. किशोर बागुल, अॅड. संभाजी पाटील, दिनेश पाटील, अॅड. अमोल ब्रह्मे, अॅड. सी. ए. भदाणे, अॅड. आर. टी. सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.