जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सिहोरवाले पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम आज म्हणजेच ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान रेमण्ड चौफुली परिसरातील लॉन्सवर आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेदरम्यान या कथा स्थळाकडे येणाऱ्या उपरस्त्यांवर वाहनांना बंदी केली आहे याबाबतचे उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी आदेश काढले आहे.

कथा होत असलेल्या परिसरातून ३ ते ९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहनांना बंदी केली आहे. यात अजिंठा चौक ते आर. एल. चौक या मार्गाला येऊन मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून सर्वसामान्यांच्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहने, रुग्णवाहिका, आयोजक, गुरुदेवांचे सेवेकरी यांनाच या रस्त्यावरून प्रवेश दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले.

११०० जणांना प्रवेश
कथेसाठी आयोजकांच्यावतीने केवळ ११०० भाविकांना पासेस दिल्या आहेत. पासेस नसलेल्या कुठल्याही भाविकाला या कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.











