जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील महिला मनीषा सुनील चव्हाण यांना त्यांच्या पतीने काढलेला ग्रामीण जीवन विमा त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना मदतीचा हात देऊन गेला. त्यांना विम्याचा एक लाख रुपये रकमेचा धनादेश नुकताच देण्यात आला.
डाकघर अधीक्षक भोजराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात साेमवारी चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस येथे मनिषा चव्हाण यांना त्यांच्या पतीचा ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा मृत्यू दावा तत्काळ मंजूर करून १ लाख ८ हजार ५४ रुपये रकमेचा धनादेश सहाय्यक डाक अधीक्षक सतीश पाठक, पोस्टमास्तर शिवदास बडगुजर, असिस्टंट पोस्ट मास्तर पीएलआय मनोज करंकाळ, चाळीसगाव टाऊनचे पोस्टमास्तर सुनील वानखेडे, डाक सहाय्यक सागर पाटील व विक्रांत बडगे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.
या दाव्याचे वैशिष्ट्य असे होते की, विमाधारक मृत सुनील चव्हाण यांनी फक्त ७ हजार ७१६ रुपये रकमेचा एकच वार्षिक हप्ता भरला होता. तरीही त्यांचा मृत्यू दावा डाक विभागातर्फे तत्काळ मंजूर करण्यात आला.