⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Positive Story : पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर ते यशस्वी उद्योजक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जगाच्या पाठीवर लाखो गुन्हेगार असून पोलिसांच्या रेकॉर्डवर देखील अनेक हिस्ट्रीशिटर आहेत. एकदा गुन्हेगारीच्या दलदलीत पडलेला व्यक्ती क्वचितच त्यातून बाहेर आल्याचे उदाहरण समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे असेच एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे. साकेगाव येथील एका हिस्ट्रीशिटरने एक आदर्श उभा केला असून गुन्हेगारी सोडून देत पापड उद्योग सुरु केला आहे. नुकतेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा उद्योग समोर आला असून त्याठिकाणी चक्क ७ ते ८ महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

भुसावळ पोलीस उपविभागामध्ये एकूण १०९ हिस्ट्रीशिटर आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग म्हणून सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यभार घेतल्यानंतर उपविभागातील सर्व गुन्हेगारांच्या विविध याद्या तयार करून घेतल्या होत्या. त्यामध्ये जबरी चोरी करणारे, घरफोडी करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे, हिस्ट्रीशिटर यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. प्रत्येक गटातील गुन्हेगारांना प्रत्येक शनिवारी ओळख परेडसाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात येत होते. या दरम्यान त्यांची संपूर्ण माहिती गोळा केली जात होती. कोणते वाहन वापरतात? कोणता मोबाईल नंबर वापरतात? काय व्यवसाय करतात? कोठे राहतात? संपर्कातील मित्र कोण? इत्यादी माहिती या दरम्यान गोळा केली जात होती.

सन २०२१ च्या जानेवारी महिन्यात भुसावळ उपविभागातील सर्व हिस्ट्रीशिटर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे ओळखपरेड कामी बोलावले होते व त्याच दिवशी त्यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना गुन्हेगारी सोडून काहीतरी व्यवसाय करण्याचे आवाहन केले होते. तसेच जर कुणी व्यवसाय, काम धंदा करून सुधारणा केली तर पोलीस त्याला मदत करतील, शिवाय त्यांचे हिस्ट्रीशीट बंद करण्यात येईल व पोलिसांकडून रात्री बे रात्री तपासले जाणार नाही, अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली होती.
हे देखील वाचा : एसपी साहेब, चला उठा… अधिकारी, कर्मचाऱ्यांना एनर्जीचा बूस्टर डोस द्या!

पोलिसांच्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करीत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील साकेगाव येथील एका हिस्ट्रीशिटरने स्वतःच्या कुटुंबीयांच्या मदतीने पापड उद्योग सुरू केला. गेल्या वर्षी त्यांचा हा पापड उद्योग अगदी चांगला सुरू झाला किंबहुना त्यांनी उद्योगासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांशिवाय आणखी सात ते आठ महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विविध तेरा प्रकारचे पापड तयार करून ते भुसावळ शहर व परिसरात विक्री करू लागले आहेत. आज उद्योगाच्या माध्यमातून सुमारे सात ते आठ महिलांना दिवसाकाठी ३५० रुपये रोजंदारी देखील ते उपलब्ध करून देत आहे. शिवाय स्वतःचे नव्या जागेत नवीन घर देखील त्यांनी बांधले आहे.

   नुकतेच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी त्यांच्या या गृह उद्योगाच्या ठिकाणी भेट दिली. एका गुन्हेगारात झालेला बदल आणि त्यांच्या उद्योगाने घेतलेली भरारी लक्षात घेता पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच त्यांचे हिस्ट्रीशीट कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन दिले.