⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

एसपी साहेब, चला उठा… अधिकारी, कर्मचाऱ्यांना एनर्जीचा बूस्टर डोस द्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार (IPS M.Rajkumar) यांनी नुकतेच पदभार स्वीकारला आहे. जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी अनेक अधिकारी इच्छुक असतात, मोठमोठी लॉबींग देखील होते. सध्याचे पोलीस अधीक्षक देखील नागपूरहून जळगाव आले असल्याने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या माध्यमातून हि बदली झाल्याची चर्चा आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता नूतन पोलीस अधिक्षकांसाठी आगामी काळ आव्हानांनी भरलेला असणार यात शंका नाही. मावळते पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (IPS Pravin Mundhe) यांच्या बदलीच्या शेवटी शेवटी त्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागले होते. गेल्या महिनाभरातील जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुन्हे शोधाचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना आताच कर्मचाऱ्यांना सूचनांच्या एनर्जीचा बूस्टर डोस देणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्हा तसा शांतताप्रिय आणि संवेदनशील देखील जिल्हा आहे. जिल्ह्याचे राजकारणी इतके मुरब्बी आहेत कि राज्याचे राजकारण हलवून टाकतात. जिल्ह्यात खून, दरोडे कमी असले तरी चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गुन्हेगारीत देखील काही खून अद्यापही उघड होऊ शकले नाही. जिल्ह्यात गॅंगवार, दररोज उदयाला येणारे नवनवीन कोवळे भाई, भाऊ गॅंगचे पंटर आणि झटपट पैसा, दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात चाकू, सुरा, बंदुका घेत सोशल मीडियावर भाईगिरी करणारे दादा दिवसेंदिवस वाढत आहे. अवैध धंदे वाढल्याने आणि पोलिसांचा प्रसाद कमी झाल्याने गुन्हेगारांचे फावले होत आहे. बऱ्याचदा तर गंभीर वाद देखील केवळ अदखलपात्र गुन्ह्यावर मोडला जात असल्याने गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते.

जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ तसा व्यवस्थित पार पडला. कोणतेही प्रकरण फार गाजले किंवा प्रलंबित राहिले असे झाले नाही. विशेष म्हणजे डॉ.मुंढे यांचा निम्मा कार्यकाळ कोरोनात गेल्याने अर्धी पण खडतर मोहीम फत्ते झाली. राज्यात सर्व व्यवस्थित सुरु असताना अचानक सरकार गडबडले आणि भाजप-शिंदे गट सत्ता प्रस्थापित झाली. राज्यात सरकार बदलताच नेत्यांचे वाद देखील वाढले. राज्यात जळगावच हिट लिस्टवर असल्याने राजकीय वादळ जिल्ह्यातूनच सुरु झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांविरुद्ध (Gulabrao Patil) राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांनी बंड पुकारला. नेत्यांच्या शाब्दिक वादात खुनशी राजकारण समोर आले आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद उभा राहिला. सुरुवातीला पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले प्रकरण तर नंतर जिल्हा दूध संघ अपहार प्रकरण समोर आले. दोन्ही प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढले गेले.
हे देखील वाचा : महाराष्ट्र पोलीस खात्यात 17130 जागांसाठी भरती, उद्यापासून भरती प्रक्रिया सुरु

जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या या वादाचे पडसाद महिनाभर उमटले आणि नेहमी पोलीसच टीकेचे धनी झाले. वाद शमत असतांना बदलीचे गॅजेट प्रसिद्ध झाले आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली झाली. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि कोणतेही बालंट अंगाशी न आल्याचे समाधान डॉ.मूढेंच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. बकाले आणि दूध संघ प्रकरण महिनाभरानंतर ते काहीसे शांत झाले आणि तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रा घेऊन जळगावात पोहचल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध सुषमा अंधारे (Sushama Andhare) वाद पेटला आणि पोलिसांना पुढे व्हावे लागले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि काही गोष्टी दबावात करून घेणे पोलिसांना भाग पडले. कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगरला जाण्यापासून रोखले.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे जिल्ह्यात नवीनच असल्याने त्यांनी जमेची बाजू साधली. कोणत्याही वादात ते समोर आले नाही. अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कात राहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली. पोलीस अधिक्षकांना वाद हाताळण्याचे मॅनेजमेंट जमले तरी पुढील वाट त्यांच्यासाठी आव्हानांनी भरलेली असणार आहे. पोलीस अधिक्षकांना मदतीला आणखी दोन मजबूत खांदे मिळणे आवश्यक आहे. एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे खमके असले तरी उपविभागीय अधिकारी डॅशिंग असणे गरजेचे आहे. तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची देखील बदली होण्याची शक्यता असून त्यांच्या जागेवर देखील दमदार अधिकारी येणे आवश्यक आहे. पोलीस अधिक्षकांना पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकारी खमके असणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : आपल्याला माहितीये का, मंगळदेवता कोण आहेत?, जाणून घ्या उत्पत्ती कथा..

राज्यातील सरकारचे अद्यापही आलबेल असल्याचे म्हटले जाते. सरकार पडणार, आघाडी होणार, युती होणार अशा अनेक चर्चा रंगत आहे. उद्धव ठाकरेंचे प्रमुख नेते खा.संजय राऊत नुकतेच जामिनावर बाहेर आले असून धरणगावात सभा घेणार असल्याचे सुतोवाच त्यांच्याकडून देण्यात आले आहे. आगामी काळात अशा अनेक नेत्यांच्या सभा जळगावकरांना पाहायला मिळणार असून त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था पोलिसांना राखावी लागणार आहे. जिल्ह्यात पुढे येऊ घातलेली जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका निवडणूक, जळगाव शहर महानगरपालिकेची मुख्य निवडणूक अवघ्या काही महिन्यात होणार आहे. साधारणतः पुढील वर्षभरात अनेक मोठमोठ्या निवडणूक पार पडणार आहे. राज्यातील पक्षीय वातावरण लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी वाद होण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पाडताना पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे देखील गरजेचे आहे. जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील गुन्हेगारी लक्षात घेता खून, दरोडे नसले तरी पशुधन चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहे. त्यातल्या त्यात शेतातून कापूस चोरी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण देखील अधिक आहे. पशुधन चोरी गेल्यावर्षी वाढल्याने आ.मंगेश चव्हाण रस्त्यावर उतरले होते तर सावदा, रावेर परिसरात पिकांचे नुकसान केले जात असल्याने खा.रक्षा खडसेंसह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. सध्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता पुन्हा तोच प्रसंग समोर येऊन पोलिसांना सामोरे जावे लागू शकते. शेतकऱ्यांच्या समस्या आहेतच पण जिल्ह्यातील अवैध धंदे देखील चांगलेच फोफावले आहे. वाळूमाफियांना रोखण्याचे सर्व मास्टर प्लॅन आजवर फ्लॉप झाले. सट्टा, पत्ता, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री, कुंटणखाने, भंगार, रेशन, बायो डिझेल, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध गॅस भरणा असे कितीतरी अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु आहेत.
हे देखील वाचा : शौक बडी चीज हैं.. अवैध सावकारी बोकाळली, सावकार तुपाशी तर गरजू उपाशी

मावळते पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना माहिती दिलेलीच असणार यात शंका नाही तरीही ग्राउंड लेव्हलला पोलीस अधिक्षकांना स्वतःचे काही स्रोत तयार करावे लागणार आहे. पोलीस दलातील मोजके चेहरे जिल्ह्याची माहिती खिशात घेऊन फिरत असले तरी ते त्यांना हवी तीच माहिती वरिष्ठांना देतील हे देखील तितकेच खरे आहे. स्थानिक पातळीवर काही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य मित्र पोलीस अधिक्षकांनी जोडल्यास त्यांना पुढील वाटचाल करणे अधिक सोपे होईल. डॉ.प्रवीण मुंढे यांनी ज्या पद्धतीने सर्व हाताळले तीच पद्धत कायम ठेवून यापुढे चालणार नाही कारण आव्हाने अधिक आणि खडतर आहेत. सध्या आळसपणाच्या आणि कामचुकारपणाच्या भूमिकेत गेलेल्या काही पोलिसांना सूचनांचा एनर्जी डोस पोलीस अधिक्षकांना द्यावाच लागणार आहे.

कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचवितांना त्यांच्याकडून कामे करवून घेण्याची दुहेरी कसरत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना पार पाडावी लागणार आहे. येणाऱ्या काळात बदल्यांचे समीकरण योग्य पद्धतीने पूर्ण करताना निवडणूक आणि इतर बाबींचा देखील विचार पोलीस अधिक्षकांना करावा लागेल. सध्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काहीसे सुस्तावस्थेत आणि आपल्याच विश्वात रममाण झाले असून त्यांना वास्तवाची जाणीव देखील करून द्यावी लागणार आहे. पोलीस वास्तववादी जगल्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखली जाणार नाही. पहिले सहा महिने, वर्षभर पोलीस अधिक्षकांनी आपली वेगळी छाप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोडल्यास नंतर त्यांना फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही.