जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । भुसावळातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कसून उपाययोजना सुरू असून त्यातच मोक्का प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सात संशयीत पसार झाल्याने त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. मोक्का प्रकरणातील निखील राजपूतसह सात संशयीत 19 मे 2022 पर्यंत अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर न झाल्यास सीआरपीसी कलम 83 प्रमाणे त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार आहे. अशा पद्धत्तीने कारवाई झाल्यास ती शहरातील पहिलीच कारवाई ठरणार असल्याने पोलिसांच्या कठोर भूमिकेने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मोक्कातील पसार संशयीत
शहरातील निखील सुरेश राजपूत (28, रा.दत्त नगर, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ), अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (24, रा.चक्रधर, रोटरी हॉलजवळ, भुसावळ), नकुल थानसिंग राजपूत (28, चंदाबाई सोसायटी, आंबेडकर वस्तीगृहाजवळ, भुसावळ), आकाश गणेश पाटील (23, नारायण नगर, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (21, चमेली नगर, वांजोळा रोड, भुसावळ), निलेश चंद्रकांत ठाकूर (21, श्रीराम नगर, दत्त मंदिराजवळ, भुसावळ), चेतन संतोष पाटील (21, श्रीराम नगर, वांजोळारोड भुसावळ) या सात जणांविरूध्द मोक्काचा प्रस्ताव मंजूर असून पोलिसांच्या कारवाईपूर्वीच संशयीत पसार झाले आहेत.
…तर संपत्ती होणार जप्त
मोक्का प्रकरणातील संशयीताविरूध्द जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष न्यायालय (मोक्का कोर्ट) यांनी संशयीतांना न्यायालयात हजर होण्यासाठी उद्घोषणा नोटीस काढून असून संशयीत 19 मे 2022 पर्यंत भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर न राहिल्यास सीआरपीसी 83 प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी सातही संशयीताच्या घरावर पोलिस पथकाकडून नोटीस डकवण्यात आली.
मालमत्तेच्या माहितीसाठी पोलिसांचा पत्रव्यवहार
सातही संशयीतांच्या नावावर काय-काय स्थावर व जंगम मालमत्ता आहे? याची माहिती काढण्यासाठी पोलिसांकडून सिटी सर्व्हे, महसूल विभाग, पालिका कार्यालय, विमा कंपन्या, विविध बँका, शेअर मार्केट कार्यालय आदी ठिकाणी पोलिसांनी पत्र व्यवहार केला असून माहिती काढण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.