लाखोंच्या गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांचा छापा : विक्रेत्याविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील नवी पेठेतील पंकज ट्रेडर शॉप या दुकानातून पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधीत पावणेतीन लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त केल्याने अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली तर विक्रेता मात्र पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलिसांसह अन्न व सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करीत नवीपेठेतील भीमसिंग मार्केटमधील मे.पंकज ट्रेडरवर गुरुवारी दुपारी छापेमारी करीत दोन लाख 62 हजार 347 रुपये किंमतीची ईलायची सुपारी, करमचंद पानमसाला, जाफरानी जर्दा, राजनिवास प्लेवर्ड पानमसाला, मिराज सुपर स्वदेशी तंबाखू, पानपराग मसाला, स्वीट सुपारी, नखराली गोल्ड, रजनी गंधा व इतर पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड (43, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार विक्रेता भरत विनायक बाविस्कर (40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.