दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या तीन बदमाशांना पोलिसांनी केली अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी करायची आणि दुसरीकडे कमी किंमतीत विकायची हा धंदा असणाऱ्या तिघा बदमाशांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. तुषार सपकाळे वय २२ रा. अंजाळा ता. यावल , तेजस सपकाळे वय २० रा. अंजाळा ता. यावल व राहूल शाम मोरे वय २० रा. हनुमंतखेडा ता.एरंडोल अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील अंजाळे येथील दोन तरुण हे दुचाकी चोरी करुन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अंमलदार दिपक पाटील, महेश महाजन, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, अशोक पाटील यांचे पथकाला अंजाळा येथे रवाना केले. अंजाळा येथून संशयित तुषार सपकाळे व तेजस सपकाळे या दोघांना पथकाने अटक केली. त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीची कबूली दिली असून त्यांच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावल येथून दुचाकी चोरीची कबूली दिसून असून ती दुचाकी एरंडोल तालुक्यातील राहूल मोरे यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने राहूल मोरे याला सुध्दा अटक केली. तीनही संशयितांना पुढील तपासासाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.