⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

गोंडगाव बालिका हत्येप्रकरणी पाचोऱ्यात बंद, निषेध रॅली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑगस्ट २०२३ | गोंडगाव (ता. भडगाव) येथील सात वर्षीय बालिकेवर अत्याचार व हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान शहरात सकाळी निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले होते.

रॕलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. तिथून देशमुख वाडी, आठवडे बाजार, जामनेर रोड या मार्गाने रॕली काढण्यात आली.
यावेळी पाचोरा शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे बंद पाळला. या रॕलीत आमदार किशोर पाटील, शिवसेनेच्या वैशाली सुर्यवंशी यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मारेकऱ्याला फाशी द्या

या वेळी मोर्चेकऱ्यांनी आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ शुक्रावारी (ता. ४) तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला होता. नगर परिषदेपासून निघालेल्या मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी युवतींनी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. आमदार किशोर पाटील यांनी मुंबईला स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भ्रमणध्वनीवरून पीडितेच्या आई-वडिलांचे बोलणे करून दिले होते.