भुसावळात पोलिसांचे भल्यापहाटे धडक कोबिंग ऑपरेशन; शस्त्रसाठा जप्त, तडीपार आरोपीसह अनेकांवर कारवाई

जून 10, 2026 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी भुसावळ उपविभागात पोलिसांनी आज दि १० जून रोजी भल्यापहाटे व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवले. या विशेष मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार व्यक्ती आणि अवैध धंद्यांवर पोलिसांनी एकाचवेळी धडक कारवाई करत गुन्हेगारांमध्ये मोठी धास्ती निर्माण केली.

combing op

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील पाहीजे असलेले आरोपी, फरार गुन्हेगार आणि शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांवर आणि अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले. तसेच रेल्वे स्टेशन, मुख्य बस स्थानक आणि शहरातील विविध लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयिताकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले. तसेच अन्य तिघांकडून तलवारी आणि धारदार कोयता हस्तगत करण्यात आला. या चारही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

तडीपार आरोपी रंगेहात पकडला

जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला एक आरोपी पोलिसांची परवानगी न घेता भुसावळ शहरात फिरताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची दुचाकी हस्तगत

मच्छी मार्केट परिसरातून पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीची चोरीची होंडा ॲक्टिव्हा (क्रमांक MH 18 BW 6155) दुचाकी जप्त केली. ही दुचाकी चोपडा शहरातून चोरीला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अवैध दारू अड्ड्यांवर छापे

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन ठिकाणांवर पोलिसांनी धाड टाकत सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

फरार आरोपीला अटक

खंडवा लोहमार्ग पोलिसांच्या अटक वॉरंटमधील फरार आरोपीलाही या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आले असून त्याला पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. भुसावळ उपविभागात राबविण्यात आलेल्या या व्यापक कोबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या भव्य आणि नियोजनबद्ध मोहिमेत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे राहुल वाघ, तालुका पोलीस ठाण्याचे महेश गायकवाड, मुक्ताईनगरचे आशिष अडसूळ, आणि बोदवडचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्यासह तब्बल २० प्रभारी व दुय्यम अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे ४५ अंमलदार, जणगाव परिमंडळातील १११ पोलीस अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे २७ अंमलदार आणि १५ महिला अंमलदार अशा मोठ्या फौजफाट्याने या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भुसावळ उपविभागातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now