जळगाव शहर

जळगावच्या पिंप्राळा-निमखेडी शिवरोडचा विकास होणार; ४ कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी महापालिका हद्दीत आणखी एका महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे. जिल्हा वार्षिक योजना (DPDC) आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या पिंप्राळा-निमखेडी शिवरोड विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पिंप्राळा व निमखेडी शिवरोडवरील सर्वे क्रमांक ३३८ ते ३४२ दरम्यान १८ मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी २४ मीटर रुंदीचा स्वतंत्र रस्ता विकसित केला जाणार आहे. या दोन्ही रस्त्यांसोबत बाजूला गटारींचेही बांधकाम करण्यात येणार आहे.

या रस्त्यामुळे पिंप्राळा आणि निमखेडी परिसरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडणी अधिक सुलभ होणार आहे. तसेच परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक अरविंद देशमुख, कविता पाटील, मानसी भोईटे, भागचंद्र (अमर) जैन, नरेंद्र पाटील, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, कविता शिवदे, जाकीर पठाण, अतुल बारी यांच्यासह नवीन सुकृती अपार्टमेंटमधील नागरिक आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४ कोटींच्या निधीतून होणाऱ्या या रस्ते विकासकामामुळे पिंप्राळा-निमखेडी परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button