बालमजुरीविरोधात जळगाव-चोपड्यात पोलिसांची कारवाई; चार बालकामगारांची सुटका, तिघा मालकांवर गुन्हे दाखल

जून 11, 2026 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । बाल हक्क संरक्षण मोहिमेअंतर्गत जळगाव तालुका पोलीस आणि चोपडा शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बालमजुरीच्या विळख्यात अडकलेल्या चार बालकामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन गॅरेज मालक आणि एका हॉटेल चालकाविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे बालमजुरी करून घेणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Maharashtra Police Bharati 2022

जळगाव तालुक्यातील चंदू अण्णा नगर येथील ‘जय बजरंग ऑटो गॅरेज’वर पोलिसांनी पहिली धाड टाकली. या ठिकाणी गॅरेज मालक रोहित भगवान पाटील (वय २२, रा. आव्हाणे) हा एका १३ वर्षीय निष्पाप बालकाला (रणजित दिलीप बारेला) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यंत धोकादायक कामे करायला लावत असल्याचे समोर आले. या बालकाला दिवसाला केवळ २०० रुपये देऊन त्याच्याशी क्रूरतेची वागणूक दिली जात होती. पोलिसांनी या बालकाची सुटका केली आहे.

दुसरी कारवाई ही जळगाव तालुका पोलिसांनी दुसरी कारवाई चंदू अण्णा नगर चौकातील ‘के.जी.एन ऑटो गॅरेज’वर केली. या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी १६ वर्षीय बालकाची (समीर शेख रहीम) मालकाच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी गॅरेज मालक अरबाज अजीज खाटीक (वय २६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी मोठी कारवाई चोपडा शहर पोलिसांनी मेणबत्ती चौक, शिरपूर रोडवरील ‘न्यू बापू टी हाऊस’ येथे केली. हॉटेल मालक राहुल भगवान महाजन (वय ३८, रा. अशोकनगर, चोपडा) याने मध्यप्रदेशातील बोरीबुजुर्ग येथील ललित रिंदरसिंग सोलंकी (वय १७) आणि शिवम सांगलाल सोलंकी (वय १५) या दोन अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये कामाला ठेवले होते. कोणत्याही सुरक्षिततेची साधने न पुरवता या मुलांकडून गॅसवर दूध गरम करणे, चहा बनवणे आणि ग्राहकांना चहा वाटणे अशी कामे घेतली जात होती. तसेच त्यांच्याकडून वाजवीपेक्षा जास्त वेळ काम करून घेत त्यांचे शोषण केले जात होते.

बालकामगार कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल
मुक्त करण्यात आलेल्या चारही बालकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून, त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या कारवाईतील सर्व आरोपी गॅरेज मालक आणि हॉटेल चालकांविरुद्ध बालकामगार अधिनियम आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now