जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन प्रेयसीचे अपहरण केले. सिनेमाला साजेशे प्रेम प्रकरण फैजपूर शहरात उघडकीस आले आहे. लग्नासाठी उतावीळ प्रेमीने चक्क प्रेयसीच्या अपहरणाचा बनाव रचला आणि सिनेमातील कथानाकाप्रमाणे प्रसंग घडवून आणला. यानंतर अवघ्या २४ तासांत हे युगुल पोलिस ठाण्यात स्वतः दाखल झाले यामुळे पोलिसांच्याही भूवया उंचावल्या आहेत.

फैजपूर शहरात दि. १७ रोजी सकाळी ७ वाजता ६० वर्षीय वृद्धा आपल्या २२ वर्षीय नातीसह मंदिरात जाण्यासाठी निघाले. यावेळी बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलीच्या वेशात, पंजाबी ड्रेस परिधान केलेला एक तरुण चारचाकीने येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. या मुलाने एक स्प्रे आजीच्या डोळ्यावर मारला. यामुळे आजीला डोळ्यात जळजळ झाली. ही संधी साधुन त्याने तरुणीला गाडीत धक्का मारुन बसवले. यानंतर चारचाकीने पलायन केले. ही घटना घडल्यानंतर आजीने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दि.१८ रोजी हे प्रेमियुगूल लग्न करुन थेट पोलिस ठाण्यात हजर झाले. लग्न करण्यासाठी प्रेयसीच्या अपहरणाचा बनाव करून तरुणीच्या आजीच्या डोळ्यात स्प्रे मारला. मात्र, डोळ्यात स्प्रे मारल्याचा जबाब आजीने खरा दिला की खोटा याचाही तपास आता पोलिस करीत आहेत.