जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२५ । सोमवारी अमेरिकन चलनाच्या मजबूतीमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय रुपया ५५ पैशांनी कमकुवत होऊन ८६.५९ या त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात दिसणार आहे. Petrol Diesel
पेट्रोल डिझेलचे दर महागणार असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होण्याची आशा सर्वसामान्यांना होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत हे शक्य दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
भारत ८४ टक्के इंधन आयात करतो, आणि हे आयात व्यव्हार डॉलरमध्ये केले जातात. यातच आता डॉलरची किंमत उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचली आहे. ज्यामुळे सध्या एका डॉलरसाठी आता ८७ रुपये मोजावे लागत आहेत. मागील वर्षी जानेवारीत ही किंमत ८३ रुपये होती. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिसणार आहे.
रशियाने भारताला कच्चे तेल देऊ नये, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, जे सामान्य जनतेच्या बजेटवर परिणाम करेल.
डॉलर महागल्याने मोबाईल आणि लॅपटॉपचे दर देखील वाढणार आहेत. भारतात मोबाईल उत्पादन जास्त प्रमाणात होत असले तरी, कच्चा माल परदेशातून आयात केला जातो, ज्यासाठी जास्त पैसे लागतात. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीवर डॉलरचा परिणाम होणार आहे आणि मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार आहेत.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी देखील ही परिस्थिती चिंताजनक आहे. परदेशात शिकताना डॉलरमध्ये फी भरावी लागते, ज्यामुळे त्या खर्चात वाढ होणार आहे. याचसोबत परदेशात फिरायला जाण्याचा खर्च देखील वाढणार आहे, कारण सर्व व्यव्हार हे डॉलरमध्ये होणार असल्याने आपोआप तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.