जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । दिवसेंदिवस अतिउष्णतेमुळे गुरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या काळात गुरांची भूक मंदावते. शरीराचे तापमान वाढून कातडी कोरडी पडते. श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, धाप लागल्यासारखे होते. डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते. पशुंना अतिसार होण्याची शक्यता बळावते. जनावरे कोणतीही हालचाल न करता बसून राहतात, अशी लक्षणे दिसताच त्वरीत पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन गुरांवर उपचार करावेत.
जनावरांना गोठ्यात किंवा थंड हवा असेल अशा जागेत बांधावे, गोठ्यामध्ये हवा खेळती असावी. गोठ्यांच्या छतावर पालापाचोळा, गवत, टाकून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे गोठा थंड राहतो. पशूंना भरपूर पाणी पाजावे. आहारात वाढीव क्षार द्यावे, दुपारच्या वेळेत जनावरे चरण्यासाठी पाठवू नये, गोठ्यात अधूनमधून पाणी फवारावे. म्हशीचा निसर्गत: रंग काळा असल्याने तसेच कातडीही जाड असल्याने उन्हाची तीव्रता वाढली की, ती लगेच तापते. त्यामुळे थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात बुडवणे आवश्यक आहे. उन्हाच्या दिवसात जनावरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. या दिवसात दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जनावरांचा गोठ्यात तसेच खेळत्या हवेत, थंड ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा. वेळोवेळी जनावरांची पशुवैद्यकांकडून तपासणी करावी. जनावरांना थंड पाण्यात स्वच्छ धुवून काढावे. झाडाच्या सावलीत किंवा इतर थंड जागेवर बांधावे, हलके पाचक गुळमिश्रित खाद्य द्या.
असे उपाय करा : दोन्ही शिगांच्या मध्ये पाण्याचे ओले कापड ठेवून त्यावर थंड पाणी टाकावे. दिवसातून तीन ते चार वेळा भरपूर पाणी पाजावे. उष्माघात झाल्यास त्वरित पशुवैद्यकांना दाखवून आवश्यक औषधोपचार करावा. मागील काही दिवसांपासून उन्ह सातत्याने तापत आहे. या तापमानाचा मानवासह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
झाडांचा आधार घेऊन सावलीत बांधलेले पाळीव प्राणी.