जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । वेदना आणि संवेदना हा कवितेचा आत्मा असला, तरी कविता ही प्रेमाच्या अधिष्ठानावरच उभी असते, असे प्रतिपादन खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी यांनी केले.
नागपूर येथे झालेल्या मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर कवयित्री प्रिया कलिका बापट (गोवा), डॉ. भारती खोपेकर आणि संयोजिका प्रा. विजयाताई मारोतकर उपस्थित होत्या. कवि संमेलनात ३२ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि संमेलनाच्या संयोजिका प्रा. विजयाताई मारोतकर यांच्या उपस्थितीत झाले. ज्येष्ठांचा सन्मान आणि नवोदितांना संधी अशी आपली व्यापक भुमिका असल्याचे प्रा. विजयाताई मारोतकर यांनी नमूद केले. कवयित्री प्रिया कलिका बापट यांनी हे संमेलन गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातला साहित्यिक दुवा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक उपाध्यक्ष विशाल देवतळे, सूत्रसंचालन भूपेश नेतनराव व डॉ. प्रभाकर तांडेकर यांनी तर राजश्री कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रा. प्रभाकर तांडेकर, प्रा. विनय पाटील, डॉ. लीना निकम, प्रा. मीनल येवले. देवदत्त संगेप आदी उपस्थित होते.
तसेच कवींनी कविता लेखन, सादरीकरणाबरोबर इतरांच्या कविता वाचल्या, ऐकल्या पाहिजे, असे प्रा. बी. एन. चाैधरी म्हणाले. नियतकालिकांसाठी कविता लिहिणे आणि व्यासपीठावर कविता सादर करणे या दोन भिन्न बाबी असल्याचे नमूद करुन प्रा. चौधरी यांनी कवींना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले. आपणच आपल्या लेखनाचे व कवितेचे परखडपणे समीक्षण करायला हवे, असे ते म्हणाले.