जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२४ । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येते. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२४-२५ या वर्षात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन हे विज्ञान व तत्रज्ञान या नवसंकल्पनावर आयोजित करावयाचे आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शने, सांस्कृतिक स्पर्धा, लोकगीत, लोकनृत्य, कौशल्य विकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वत्क्तृत्व स्पर्धा, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग व अॅग्रो प्रॉडक्ट व मोबाईल फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. याच युवा महोत्सवाचा एक भाग म्हणजे जळगाव युथ आयकॉन- ज्या युवक/ युवतींनी सामाजीक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, तसेच नैसर्गिक आपत्ती, इतर आपत्कालीन परिस्थीतीत उल्लेखनिय कार्य केले असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
या युवा महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकणार आहे . स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाद्वारे विविध पारितोषिके तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यातयेणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येणार व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त युवक युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवाकरीता करण्यात येणार आहे. पुढे राष्ट्रीय युवा महोत्सवाकरीता प्राविण्य प्राप्त युवक व युवती यांची निवड केली जाईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले.
युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळे, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
जळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, वैयक्तिक युवक-युवती यांनी आपले प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी ९८२३७७३७९७ आणि ८६२५९४६७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा छ त्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.