विजबिलाच्या थकबाकीवर ६६ टक्के सूट मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी; वाचा काय आहे योजना

ऑक्टोबर 23, 2021 5:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या ‘महा कृषी ऊर्जा अभियाना’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. जळगाव परिमंडलातील ८२ हजार १४० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

maha krushi yojna jpg webp

या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानात शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे ६६ टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत जळगाव परिमंडलातील ८२ हजार १४० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ९७ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ४३ हजार ३४५ ग्राहकांनी ५९ कोटी ८५ लाख, धुळे जिल्ह्यातील २३ हजार २२२ ग्राहकांनी १५ कोटी ६९ लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील १५ हजार ५७३ ग्राहकांनी २२ कोटी ४० लाख रुपये वीजबिल भरले आहे. या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे. जळगाव परिमंडलात १५ हजार ४६३ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. यात जळगाव जिल्ह्यात ७ हजार ७७४, धुळे जिल्ह्यात २ हजार ८२६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजार ८६३ ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

जळगाव परिमंडलातील ३ लाख ६४ हजार १५२ शेतकऱ्यांकडे एकूण ५४२२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ३५२३ कोटी ३० लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी १७६१ कोटी ६५ लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे. या ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now